राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाची शक्यता; दिवसा कडक ऊन, रात्रीही तापमानात वाढ – नागरिक त्रस्त; उष्णतेची तीव्र लाट कायम; पंखे, कूलरही थकले
राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून बुधवारी (दि. ९) अकोला शहरात ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊन ते राज्यातील सर्वाधिक तापलेले शहर ठरले. त्यानंतर जळगाव ४३.३, अमरावती ४३, चंद्रपूर ४२.६ अंश इतके तापमान नोंदवले गेले. विदर्भासह राज्यातील बहुतांश भागांत पारा ४० अंशांच्या पुढे गेला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारचा दिवस असह्य उष्णतेने होरपळून निघाला. दरम्यान, गुरुवारपासून (दि. १०) राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या पश्चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, मध्य-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत आणि मध्य प्रदेश ते पश्चिम बंगाल मार्गे झारखंडपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने हवामानात बदल होत आहे. यामुळे अनेक भागांत वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कडक उन्हासोबतच दमट हवामानाचा अनुभव नागरिका...