Skip to main content

येरवडा विभागात बोगस रेशनकार्डधारकांवर कारवाई; ३२ हजार कागदपत्रांची पडताळणी सुरू; सरकारी अन्नधान्याचा गैरवापर रोखण्याचा प्रयत्न; दुकानदारांना मार्गदर्शक सूचना

पुणे – खोट्या माहितीच्या आधारे बनवलेल्या बोगस शिधापत्रिकाधारकांवर येरवडा परिमंडळ विभागाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विभाग प्रशासनाने तब्बल ३२ हजार शिधापत्रिकाधारकांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेमध्ये अपात्र लाभार्थ्यांचे कार्ड रद्द करण्यात येणार आहेत.

या तपासणीमध्ये नागरिकांनी दिलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची खातरजमा केली जाणार असून, खोटी माहिती देणाऱ्यांवर गरज पडल्यास पोलिस कारवाई केली जाईल, अशी माहिती ई परिमंडळाचे अधिकारी चांगदेव नागरगोजे यांनी दिली. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार ही कारवाई ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

मोहीमेदरम्यान पिवळे, केसरी आणि पांढरे रेशन कार्डधारकांची चौकशी करण्यात येणार आहे. खास करून, रास्त भाव दुकानांमधून एप्रिल महिन्याचे धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना अर्ज वाटण्यात येतील. अर्ज भरून देताना मागील वर्षभरातील रहिवासी पुरावा (जसे की लाईट बिल किंवा मतदान ओळखपत्र) आणि उत्पन्नाचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तपासणीनंतर खोटी माहिती आढळल्यास संबंधितांची शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे. यासोबतच, दुबार कार्डधारक, मृत व्यक्तींच्या नावावर असलेली शिधापत्रिका आणि ५९ हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेले लाभार्थीही या मोहिमेतून अपात्र ठरणार आहेत.

महत्त्वाचे मुद्दे –
येरवडा परिमंडळात ३२ हजार केसरी व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांची पडताळणी सुरू

४६१ पिवळ्या कार्डधारकांचा समावेश

सुमारे १.०८ लाख लाभार्थ्यांना सध्या रेशनचा लाभ

५९ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांनाच धान्याचा लाभ

उत्पन्न ५९ हजार ते १ लाख दरम्यान असणाऱ्यांना फक्त केसरी कार्ड, पण धान्य नाही

अपात्रांचे कार्ड रद्द झाल्यानंतर नव्या पात्र लाभार्थ्यांना संधी


या पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानांतील सर्व दुकानदारांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, शासनाच्या या मोहिमेचे काटेकोर पालन होईल, असे नागरगोजे यांनी सांगितले. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Comments