मुंबई, ११ एप्रिल: महाराष्ट्र सरकारचे 'आपले सरकार' (Aaple Sarkar) ई-सेवा केंद्र आजपासून पुढील पाच दिवसांसाठी, म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. महा ऑनलाइनच्या सर्व्हरवर नियमित देखभाल व तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
आपले सरकार पोर्टल हे राज्यातील नागरिकांसाठी अनेक शासकीय सेवांचा महत्त्वाचा दुवा ठरले आहे. उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्र, जात पडताळणी, दुकान परवाना यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे याच पोर्टलच्या माध्यमातून मिळतात. तसेच, विविध सरकारी योजनांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही या पोर्टलद्वारे पार पाडली जाते.
या पाच दिवसांच्या कालावधीत पोर्टल बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना, तसेच अन्य शासकीय कागदपत्रांची गरज असलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ई-सेवा केंद्रांमध्ये नेहमी प्रमाणे सेवा मिळणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.
शासनाकडून सांगण्यात आले आहे की, या काळात काही तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आणि सेवा अधिक सुलभ केली जाईल. मात्र, नागरिकांनी कोणतेही ऑनलाईन काम असल्यास ते १४ एप्रिलनंतर करावे, असा सल्ला दिला गेला आहे.
Comments
Post a Comment