पुणे: तनिषाच्या मृत्यूमागे दीनानाथ रुग्णालयाचा बेजबाबदारपणा? पोलिस चौकशीत सीसीटीव्हीचा धक्कादायक खुलासा
पुणे | प्रतिनिधी सात महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 'तनिषा'चा बळी?
पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सात महिन्यांची गर्भवती तनिषा भिसे हिचा मृत्यू या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणा आणि पैशाच्या हव्यासामुळे झाल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.
तनिषा भिसे यांना अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा धक्कादायक दावा कुटुंबीयांनी केला आहे. अडीच लाख रुपये तत्काळ देण्याची तयारी दाखवूनही उपचारास नकार देण्यात आल्याने तनिषाच्या प्रकृतीत बिघाड होऊन मृत्यू झाल्याचे समजते.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तनिषाला रुग्णालयात तब्बल साडे पाच तास थांबवण्यात आले आणि त्या काळात कुठलेही उपचार करण्यात आले नाहीत. यामुळे रुग्णालयाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर सामाजिक संघटनांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आंदोलने केली. जनक्षोभ वाढताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून थेट कारवाई करता येत नसल्याने त्यांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्राद्वारे दीनानाथ रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने देखील याप्रकरणी पाच सदस्यीय समिती स्थापन केली असून, ही समिती आज सोमवारी आपला अहवाल सादर करणार आहे. आता या अहवालातून नेमकी कोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
गरीबान साठी हे हॉस्पिटल बांधण्यात येत आहे.. असे हॉस्पिटल बांधताना सांगण्यात आल होत..ज्याच्या साठी आदरणीय बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या पासुन अनेक लोकांनी, सरकारने तिजोरी मोकळी करून दिली..भारत पाकिस्तान मॅच खेळवली गेली..पण मंगेश कर रुग्णालयात फक्त ईन्कमिंग चालु असते..पेशंट दरवाजातून आत आल्या आल्या 20..25..40 भरावेच लागतात..हे किरकोळ.. मग 3..4 हजाराची ऑषध प्रत्येक खेपेला..सकाळ संध्याकाळ चालुच..अजुन बरच काही आहे..पण लिहिणार कीती.. जरा जनाची नाही तर मनाची. ठेवा.
ReplyDelete