पुण्यात सराफाला हनीट्रॅपमध्ये अडकवून २७ लाखांची फसवणूक; १३ वर्षे सुरू होता ब्लॅकमेलचा खेळ; पोलिसांकडून तपास सुरू
पुणे: शहरातील एका नामांकित सराफ व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून तब्बल २७ लाख ५६ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केडगावच्या एका ३२ वर्षीय महिलेने व्यापाऱ्याला बदनामीची भीती दाखवून गेल्या १३ वर्षांपासून आर्थिक फसवणूक केली. अखेर व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सुरुवात २०१३ मध्ये झाली, जेव्हा महिलेने आपल्याला दागिने बनवायचे आहेत, असं सांगत व्यापाऱ्याशी ओळख वाढवली. त्यानंतर फोन आणि व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. एका प्रवासादरम्यान महिलेनं व्यापाऱ्याला गावी बोलावून नातं अधिक घट्ट केलं. पुढे हीच जवळीक महिलेनं ब्लॅकमेलसाठी वापरली.
महिलेनं अनेकदा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यापाऱ्याकडून पैसे उकळले. सुरुवातीला दबावामुळे व्यापारी पैसे देत गेला. परंतु आर्थिक अडचणींमुळे जेव्हा पैसे देता आले नाहीत, तेव्हा त्याने संपूर्ण प्रकार पत्नीला सांगितला. बदनामी होईल या भीतीने पत्नीने घर विकण्याचा सल्ला दिला.
व्यापाऱ्याने पुण्यातील आपलं घर विकून महिलेला १८ लाख रुपये दिले. या पैशातून महिलेनं ४३ लाखांचं घर खरेदी केलं. उर्वरित २३ लाखांच्या कर्जाचे हफ्तेही व्यापाऱ्यालाच भरायला लावले. आतापर्यंत व्यापाऱ्याने २७ लाख ५६ हजार रुपये दिले आहेत.
महिलेच्या पैशाच्या वाढत्या मागण्या सहन न झाल्याने अखेर व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment