Skip to main content

पुणे: तातडीच्या उपचारासाठी पैशांची अट नाही – महापालिकेची खासगी रुग्णालयांना नोटीस; तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध

पुणे : तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास सक्त मनाई करत पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे. "रुग्णावर तातडीने उपचार करणे हे प्राधान्य असावे, पैशांची अट लावू नये," असा स्पष्ट संदेश महापालिकेने दिला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी तनिषा भिसे या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, संबंधित रुग्णालयाविरुद्ध जनआंदोलन पेटले होते. पैशांच्या मागणीवरून उपचार न केल्याचा आरोप झाल्याने आरोग्य सेवा आणि रुग्ण हक्क याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या घटनेनंतर रुग्णालयाने भूमिका स्पष्ट करत अनामत रक्कम न घेण्याची घोषणा केली होती.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाठवलेल्या नोटीसमध्ये सर्व खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आले आहे की, रुग्ण किंवा नातेवाईकांकडून तातडीच्या वेळी कोणतीही आर्थिक अट लावू नये. रुग्णांच्या जीवित रक्षणाच्या दृष्टिकोनातून ‘सुवर्णकालीन उपचार’ वेळेत देणे अनिवार्य आहे.

८९ रुग्णालयांना नोटीस, ८६० ची तपासणी पूर्ण
महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरातील ८६० खासगी रुग्णालयांची तपासणी केली. या तपासणीत ८९ रुग्णालयांमध्ये नियमभंग व त्रुटी आढळून आल्या असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तपासणीत रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक व टोल फ्री क्रमांकाची अंमलबजावणी तपासली गेली.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध
जर एखाद्या रुग्णालयाने तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम मागितली किंवा वैद्यकीय नियमांचे पालन केले नाही, तर नागरिकांनी १८००२३३२१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

महापालिकेच्या या पावलामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना तातडीच्या प्रसंगी दिलासा मिळणार असून, रुग्ण हक्कांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Comments