पुणे, दि. ३० एप्रिल: सध्या प्रशासक राज्यात असलेल्या पुणे महानगरपालिकेत उपआयुक्त श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते रमेश विष्णू खामकर यांनी नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत हे आरोप केले आहेत.
खामकर यांच्या म्हणण्यानुसार, पुणे महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असून, नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने निर्णय घेतले जात असून, वरिष्ठ नागरिकांनाही अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.
खामकर यांनी उपआयुक्त पाटील यांच्यावर खालीलप्रमाणे आरोप केले आहेत:
अनधिकृत मुदतवाढ: शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या श्रीमती पाटील यांनी मनमानी पत्रव्यवहार करून पुणे महानगरपालिकेत आपली नियुक्ती दोन वर्षांनी वाढवून घेतली असून, त्यांनी ४ वर्षांहून अधिक कालावधी सेवा बजावलेली आहे.
महत्त्वाच्या खात्यांवर नियंत्रण: मालमत्ता, भूसंपादन, सामान्य प्रशासन व कर विभाग यांसारख्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या खात्यांचा पदभार श्रीमती पाटील यांच्याकडे असून, तो त्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून मिळवल्याची चर्चा प्रशासनात आहे.
पदोन्नती प्रक्रियेत भ्रष्टाचार: स्टाफ नर्स, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि इतर पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत संगनमताने आर्थिक व्यवहार झाल्याचे आरोप आहेत. गुणवत्ता पडताळणी परीक्षेच्या नावाखाली आर्थिक मागणी केली गेल्याचेही म्हटले आहे.
पूर्वलक्षी अध्ययन रजा मंजुरीचा वाद: डॉ. पाटील या अधिकाऱ्यास नीट पीजी परीक्षेत कमी गुण असूनही पुणे महापालिकेच्या निधीतून अध्ययन भत्ता दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याआधी अशा प्रकारची रजा कोणालाही मंजूर झालेली नाही.
खामकर यांनी या सर्व बाबींवर सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी मुख्य सचिव, महाराष्ट्र शासनमार्फत चौकशीची मागणी केली असून, संबंधित विभागाकडून स्वयंस्पष्ट अहवाल मागविण्याची विनंती केली आहे.
---
Comments
Post a Comment