Skip to main content

सावधान ! राज्यात 1 ते 31 एप्रिल दरम्यान रेशन कार्ड पडताळणी मोहीम; वास्तव्याचा पुरावा नाही ? 15 दिवसांत रेशन बंद !

राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने अपात्र रेशन कार्ड शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. आता प्रत्येक कुटुंबाच्या रेशन कार्डची पडताळणी केली जाणार आहे.

1 एप्रिलपासून 31 एप्रिलपर्यंत अपात्र शिधापत्रिका शोधल्या जाणार आहेत. बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचे आढळल्यास ते रद्द केले जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत एक आदेश जारी केला जाणार आहे. 

अपात्र रेशनकार्ड रद्द होणार 
अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या आदेशानुसार राज्यातील अंत्योदय, केशरी आणि शुभ्र अशा सर्वच शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. यात जी कार्डे अपात्र असतील ती लगेच रद्द केली जाणार आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी अशी मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे राज्यातील बनावट आणि अपात्र रेशनकार्ड बंद होणार आहेत.

पत्त्याचा पुरावा द्यावा लागणार 
समोर आलेल्या माहितीनुसार, अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी रेशन दुकानदारांना फॉर्म दिले जाणार आहेत. हे फॉर्म भरून घेतल्यानंतर कोण अपात्र आहेत, ते स्पष्ट होणार आहे. या फॉर्मसोबत वास्तव्याचा पुरावा (रहिवासी दाखला) जोडावा लागणार आहे. हा पुरावा एक वर्षापेक्षा जुना नसावा ही मुख्य अट असणार आहे. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना 15 दिवसांची मुदत दिली जाईल. मात्र ज्या लोकांकडे हा पुरावा नसेल त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे.

... तर तुमचे रेशनकार्ड रद्द होणार 
रेशन कार्डधारकांनी दिलेल्या माहितीची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाणार आहे. ज्यांनी वास्तव्याचा पुरावा दिलेला नसेल, त्यांना 15 दिवसांचा वेळ दिला जाणार आहे, मात्र एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असतील किंवा एका कुटुंबात दोन कार्डे दिलेली असतील, तर त्यातील एक रद्द केले जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडेही एका पत्त्यावर दोन रेशनकार्ड असतील तर तुमचे एक कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. 

वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास शिधापत्रिका रद्द होणार 
अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार ज्या शासकीय, निमशासकीय, खासगी कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर ते तत्काळ अपात्र ठरवले जाणार आहे. अशा लोकांना त्यांच्या उत्पन्नानुसार रेशनकार्ड दिले जाणार आहे. तसेच दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मृत व्यक्तींना लाभार्थीच्या यादीतून वगळले जाणार आहे अशी माहितीही समोर आली आहे. 

Comments