पुणे, ७ एप्रिल – खडकवासला धरणातून वारजे जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी १६०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वाहिनी मंगळवारी, ८ एप्रिल रोजी दुरुस्तीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
सध्या एनडीए रस्त्यावर, वारजे पोलिस ठाण्याजवळ सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, त्यादरम्यान जलवाहिनीला धक्का लागल्याने ही गळती झाली आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी जलवाहिनी फुटली होती. पुनश्च अशीच घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पहा व्हिडिओ
या जलवाहिनीवर वारजे, कोथरूड, बावधन, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, पाषाण, भोसलेनगर, बाणेर, बालेवाडी, शिवणे औद्योगिक वसाहत व खडकीचा काही भाग या परिसरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. दुरुस्तीच्या कामामुळे या सर्व भागांत मंगळवारी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून, टँकरद्वारेही पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी आवश्यक ती पाण्याची साठवण करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच, सांडपाणी वाहिनीसाठी खोदकाम करताना अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे निरीक्षण आता व्यक्त केले जात आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
Comments
Post a Comment