पुणे: १० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची मोठी कारवाई; पुढील दोन वर्षांसाठी पुणे हद्दीतून हकालपट्टी; पोलिसांचे आवाहन – तडीपार आरोपी दिसल्यास तात्काळ माहिती द्या
पुणे: शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच वेळी १० सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली आहे. हे सर्व गुन्हेगार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा हद्दीतून पुढील दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहेत.
परिमंडळ पाच अंतर्गत लोणी काळभोर, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी आणि हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या या गुन्हेगारांवर ही कठोर कारवाई करण्यात आली. यामध्ये खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग, अंमली पदार्थ विक्री आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, "गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक बसावा आणि सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ही कारवाई केली आहे. आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए आणि तडीपार अंतर्गत कारवाई सुरू आहे."
तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार –
1. फिरोज शेख (लोणी काळभोर) – खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे (४ गुन्हे)
2. प्रसाद जेठीथोर (लोणी काळभोर) – दहशत निर्माण करणे, मारहाण (३ गुन्हे)
3. चंद्रशेखर उर्फ पिल्या चोरमोले (लोणी काळभोर) – शस्त्र बाळगणे, धमकावणे (५ गुन्हे)
4. अजय जाधव (मुंढवा) – बलात्कार, शिवीगाळ, मारहाण (१० गुन्हे)
5. हनुमंत सरोदे (मुंढवा) – हातभट्टी, धमकावणे (७ गुन्हे)
6. साहील साठे (मुंढवा) – खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी (५ गुन्हे)
7. वसीम पटेल (कोंढवा) – जबरी चोरी, अंमली पदार्थ विक्री (८ गुन्हे)
8. वसीम उर्फ वस्सु खान (कोंढवा) – खुनाचा प्रयत्न, विनयभंग (४ गुन्हे)
9. ओंकार स्वामी (बिबवेवाडी) – मारण्याचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे (४ गुन्हे)
10. आदीराज कामठे (हडपसर) – जबरी चोरी, मारहाण (३ गुन्हे)
पोलीस उपायुक्त डॉ. शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपींपैकी कोणीही पुणे शहर, पिंपरी चिंचवड अथवा जिल्हा हद्दीत दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
१०० दिवसांत ५१ सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई
परिमंडळ पाचने २०२५ मध्ये केवळ १०० दिवसांत ५१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. यामध्ये ९ जणांवर एमपीडीए, २१ जणांवर मोका, तर ११ जणांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे हे धोरण पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
पोलिस प्रशासनाने आसे कठोरपणे अंमलबजावणी केली तर गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना पोलिस प्रशासनाचा वचक दरारा निर्माण होऊन भीती पोटी गुन्हे गारी कमी होऊ शकते जय हिंद जय महाराष्ट्र
ReplyDelete