Skip to main content

राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाची शक्यता; दिवसा कडक ऊन, रात्रीही तापमानात वाढ – नागरिक त्रस्त; उष्णतेची तीव्र लाट कायम; पंखे, कूलरही थकले

राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून बुधवारी (दि. ९) अकोला शहरात ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होऊन ते राज्यातील सर्वाधिक तापलेले शहर ठरले. त्यानंतर जळगाव ४३.३, अमरावती ४३, चंद्रपूर ४२.६ अंश इतके तापमान नोंदवले गेले. विदर्भासह राज्यातील बहुतांश भागांत पारा ४० अंशांच्या पुढे गेला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारचा दिवस असह्य उष्णतेने होरपळून निघाला.

दरम्यान, गुरुवारपासून (दि. १०) राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात सध्या पश्चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, मध्य-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत आणि मध्य प्रदेश ते पश्चिम बंगाल मार्गे झारखंडपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने हवामानात बदल होत आहे. यामुळे अनेक भागांत वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत कडक उन्हासोबतच दमट हवामानाचा अनुभव नागरिकांना येत असून, त्यामुळे तापमानवाढीचा त्रास अधिक जाणवतो आहे. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, जालना, पालघर, ठाणे आदी भागांत रात्रीच्या तापमानातही वाढ झालेली असून पंखे, कूलर रात्रीभर सुरू ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

दरम्यान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, सौराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट राहणार असून, या भागांतील तापमान ४५ अंशांपेक्षा अधिक जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बुधवारी राज्यातील काही शहरांचे तापमान (अंश सेल्सिअस):
अकोला – 44.1, जळगाव – 43.3, अमरावती – 43, चंद्रपूर – 42.6, पुणे – 41.3, सोलापूर – 41.8, नाशिक – 41, यवतमाळ – 41.2, नागपूर – 40.8, सांगली – 40.3, धाराशिव – 40.2

अवकाळी पावसाचा अंदाज असलेले प्रमुख जिल्हे:
सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ.

राज्यात उष्णतेसह आता वळवाच्या पावसाचीही शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments