पुणे : पुणे पोलिसांनी स्थानबद्ध केलेल्या नंदू ऊर्फ नंदकुमार बाबूराव नाईक (वय ७२) याला आठ दिवसांतच मुक्त करण्यात आले. राज्याच्या गृह विभागाने स्थानबद्धतेचा निर्णय रद्द केल्यामुळे त्याची सुटका झाली आहे.
नंदू नाईक हा खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार पेठ परिसरात बेकायदा मटका, जुगार आणि इतर गैरकायदेशीर धंदे चालवत असल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात एकूण ६३ गुन्हे दाखल असून, २०२१ पासून त्याच्यावर मटका आणि जुगारासंबंधी १२ प्रकरणे नोंद आहेत. पुणे पोलिसांनी वेळोवेळी त्याच्या अड्ड्यावर छापे टाकून कारवाई केली होती, मात्र त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा झाली नव्हती.
यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे पाठवला होता. या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ मार्च रोजी नाईकला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याला नागपूर कारागृहात पाठवण्यात आले. मात्र, राज्याच्या गृह विभागाने ही कारवाई रद्द केल्याने नाईकची आठ दिवसांतच सुटका करण्यात आली.
नंदू नाईक याच्यावर यापूर्वीही मोठी कारवाई झाली आहे. काही वर्षांपूर्वी बंडू आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई झाली होती. त्यात नंदू नाईककडून आंदेकर टोळीला आर्थिक मदत मिळत असल्याच्या कारणावरून त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणातही त्याला जामीन मिळाला होता.
या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेवर आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पैसेवाले गुन्हेगारांचे राज्य आहे
ReplyDelete