Skip to main content

Success Story: ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र अभ्यास, एकत्र वकिली अन् आता तिघेही झाले न्यायाधीश

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाच्या परीक्षेत शिरूर तालुक्यातील तीन मित्रांनी एकत्र यश मिळवत मैत्रीची अनोखी यशोगाथा लिहिली आहे. अॅड. शुभम कराळे, अॅड. सागर नळकांडे आणि अॅड. अक्षय ताठे या तिघांचीही न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे, त्यामुळे या मैत्रीची राज्यभर चर्चा रंगली आहे.

हे तिन्ही मित्र कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आले होते. अॅड. शुभम कराळे शिक्रापूरचा, अॅड. सागर नळकांडे बुरुंजवाडी गावचा आणि अॅड. अक्षय ताठे कारेगावचा रहिवासी आहे. वेगवेगळ्या महाविद्यालयांतून LLB पूर्ण केल्यानंतर तिघांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून LLM पूर्ण केले. त्यानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. अॅड. शुभम कराळे फौजदारी न्यायालयात, तर अॅड. सागर नळकांडे आणि अॅड. अक्षय ताठे दिवाणी न्यायालयात वकिली करत होते.

एकत्र अभ्यास, एकत्र यश
न्यायाधीश होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिघांनी चार वर्षे नियमित अभ्यास केला. परीक्षा जवळ आल्यावर मोबाईलचा कमीत कमी वापर आणि आशिलांशी मर्यादित संपर्क ठेवत त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गणेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी MPSC च्या न्यायाधीश परीक्षेची तयारी केली.

२०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत तिघांनी एकत्र बसून तयारी केली आणि पूर्व व मुख्य परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ११४ विद्यार्थ्यांची न्यायाधीशपदासाठी निवड झाली असून, त्यात या तिघांचाही समावेश आहे.

एका तालुक्यातून शिक्षणासाठी एकत्र निघालेला हा प्रवास आता लोकसेवेपर्यंत पोहोचला असून, हे तिघे मित्र राज्यातील विविध न्यायालयांमध्ये न्यायदानाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

Comments

Post a Comment