परी, ता. २५ : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तांनी हद्दीतील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग तातडीने हटविण्याच्या स्पष्ट सूचना अनधिकृत बांधकाम व निमुर्लन विभागाला दिल्या.
पाऊस जोरात पडत असताना ही प्रक्रिया मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
अद्ययावत यंत्रणेचा अभाव असल्याने दिवसाला केवळ एक मोठे होर्डिंग हटविले जात आहे. हद्दीतील शेकडो धोकादायक होर्डिंग कधी हटविली जाणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्याच्या स्थितीत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आषाढी वारीच्या काळात 'पीएमआरडीए'च्या हद्दीतील दोनशेपेक्षा जास्त होर्डिंग तातडीने हटविण्यात आली होती. त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते, हे वास्तव आहे. वारीनंतर मात्र ही गती नेहमीप्रमाणे संथ झाली आहे. आयुक्तांनी मोठी होर्डिंग अर्ध्यावर वाकवून, तातडीने काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. अनेक ठिकाणी त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
---
एजन्सीसाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ
प्रशासकीय यंत्रणेकडून होर्डिंग हळूवारपणे काढली जातात. ही होर्डिंग पुन्हा वापरता यावीत म्हणून संबंधित एजन्सीच जाणीवपूर्वक सावधगिरी बाळगत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संपूर्ण होर्डिंग हटविण्याची प्रक्रिया संथ होते. यात एनज्सीचे हित साधले जात असले तरी , नागरिकांच्या जिवाशी खेळ केला जातो.
यामुळे आयुक्त डॉ. म्हसे यांनी संबंधित एजन्सीला यापूर्वी कडक शब्दांत फटकारले आहे. अशी उदासीनता यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. यानंतरही या कामाची गती वाढल्याचे दिसत नाही.
---
नव्याने बैठक होणार
'पीएमआरडीए'च्या हद्दीत नागरी व व्यापारी भागांमध्ये तसेच महामार्गांच्या कडेला अनेक मोठी होर्डिंग्ज उभी आहेत. ती हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुक्त नव्याने बैठक घेणार असून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारी निश्चित करून स्पष्ट कार्यवाहीचे आदेश दिले जातील. नागरिकांच्यादृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने ठोस कृती करणे आवश्यक आहे. अन्यथा दुर्घटनांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
---
मोठी होर्डिंग खाली आणून वाकवून काढण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत. तरी त्यामध्ये काही त्रुटी आढळत आहेत. पुन्हा संबंधित विभागाचे अधिकारी आणि खासगी एजन्सीच्या प्रतिनिधींना बोलावून बैठक घेऊ. त्यावेळी कार्यवाहीला गती देण्याची सूचना करण्यात येईल.
- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, 'पीएमआरडीए'
-----
फोटो
34378
Comments
Post a Comment